(ठाणे / वृत्तसंस्था )
व्हिडीओ कॉलदरम्यान तरुणीचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उकळल्याचा प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जेनिश भंसाली याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथे राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीशी आरोपी खास झालेल्या ओळखीमधून व्हिडीओ कॉलवर बोलत होता. यावेळी आरोपीने स्वतः नग्न होऊन तरुणीलाही विश्वासात घेत कपडे काढण्यास भाग पाडले आणि ती नग्न अवस्थेत असताना तिचे नकळत स्क्रीन रेकॉर्डिंग केले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.
बदनामीची भीती दाखवत आरोपीने तरुणीकडून घरातील सोन्याची रिंग, नथनी, सोन्याची चेन, झुमके, सोन्याचे हार, बांगड्या, कडे आणि मांगटिका घेतले. या दागिन्यांचे एकूण वजन १४०.५ ग्रॅम असून त्यांची किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दागिने देण्यासाठी तरुणी भाईंदर पश्चिम येथे आली असताना आरोपीने तिला मिरा रोड स्टेशनवर सोडतो असे सांगितले. मात्र, त्याने तिला गोराई येथे नेले आणि तेथे तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या पीडित तरुणीने भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे भाईंदर पोलिसांनी जेनिश भंसाली याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.


