(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या नित्य अलंकारांसह जडावाचे दागिने, उत्सवमूर्तीवरील सुवर्णालंकार, चोपदार दंड, सोन्याचा सिंह, गदा, किरीट, पादुका, कुंडले आणि चंद्रहार अशा विविध सुवर्णालंकारांची स्वच्छता करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ही प्रक्रिया केली जात आहे. अलंकारांच्या स्वच्छतेचे काम मंगळवारी (दि. ६) रोजी करण्यात आले.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून मंदिर परिसरातील तयारीला वेग आला आहे. आय स्मार्ट कंपनीच्या वतीने मंदिर परिसरात मोफत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात मंदिराचा बाह्य परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांना पॉलिश करण्याचे कामही करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दर्शनरांगेत पाणी आणि फॅनची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. तसेच मंदिर परिसरातील विद्युत रोषणाईसाठी आवश्यक वायरिंग व जोडणीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पूर्ण पीठ म्हणून जगभर ओळखले जाते. नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवात देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात. या काळात आदिशक्ती अंबाबाईची नऊ दिवस विविध रूपांत सालंकृत पूजा केली जाते. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुवर्णजडित अलंकारांमध्ये आदिलशाहीच्या काळातील काही दागिन्यांचाही समावेश आहे.
शिलाहार, चालुक्य, यादव आणि छत्रपती घराण्यातील राजांच्या काळात देवीला सोन्या-चांदीचे दागिने, मुकुट तसेच मौल्यवान वस्तू अर्पण करण्यात आल्या होत्या. हा ऐतिहासिक खजिना आजही पाहायला मिळतो. या दागिन्यांच्या वार्षिक स्वच्छतेची जबाबदारी कोल्हापुरातील खांडेकर कुटुंबीयांकडे आहे. गेली चार शतके खांडेकर कुटुंबातील दहा पिढ्या ही सेवा अखंडपणे बजावत आहेत.
इंद्रोजी खांडेकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता महेश खांडेकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. दररोज आई अंबाबाईच्या खजिन्याची पाहणी करणे, नवरात्रोत्सवाच्या काळात संपूर्ण दागिन्यांची स्वच्छता करणे आणि खजिन्याचा रखवालदार म्हणून जबाबदारी पार पाडणे, अशा तिहेरी भूमिकेत महेश खांडेकर सेवा बजावत आहेत. या सेवेबद्दल भावना व्यक्त करताना त्यांनी, “लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई अंबाबाईची सेवा करायला मिळते हे आमचे भाग्य असून, यापुढचे जन्मसुद्धा आई अंबाबाईच्या सेवेसाठीच मिळावेत”, अशी भावना व्यक्त केली आहे.
देवीच्या ज्या ऐतिहासिक सुवर्णालंकारांची स्वच्छता केली जात आहे, त्यामध्ये शिवकालीन कवड्याची माळ, 16 पदरी चंद्रहार, सोन्याची पालखी, सिंह, गदा, त्रिशूळ, बोरमाळ, पुतळ्यांची माळ, ठुशी, कुंडल, सोन्याचा किरीट, कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, लप्पा (गळ्यातील हार), पायातील तोडे, नथ आणि सातपदरी कंठी अशा अनेक अलंकारांचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दिवस अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता सुरू आहे. खजिना सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या खांडेकर कुटुंबीयांपैकी महेश खांडेकर हे हे काम पार पाडत आहेत. स्वच्छतेनंतर अंबाबाईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या चांदी आणि सुवर्णालंकारांना पुन्हा झळाळी मिळणार आहे.


