(रत्नागिरी / वार्ताहर)
टाळ-मृदंगांचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष, भजन-कीर्तनाचा भक्तिमय निनाद आणि बाजारपेठेतील खरेदीचा उत्साह अशा दुहेरी वातावरणात रत्नागिरीतील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर कार्तिकी एकादशीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आज (ता. २१) कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा व अभिषेक असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या मध्यरात्री बारा वाजता विठुरायाची सवाद्य रथोत्सव मिरवणूक शहराच्या बाजारपेठेतून काढण्यात येणार आहे. दुसरीकडे, या यात्रेनिमित्त शहरातील बाजारपेठाही ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या असून, व्यापारी वर्गासाठी कार्तिकी एकादशीचे हे तीन दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहेत. या कालावधीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध भजन मंडळांचे कार्यक्रम होणार असून, प्रविण सावंतदेसाई यांचे कीर्तनही आयोजित करण्यात आले आहे. महिला भजन मंडळांसह परिसरातील नामांकित भजन मंडळे विठ्ठलभक्तीचा जागर करणार आहेत. यात्रेची सांगता २५ नोव्हेंबरला काकड आरतीने होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अशोक मयेकर यांनी दिली.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आषाढी यात्रेच्या काळात कोकणातील शेतकरी आणि वारकऱ्यांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नसल्याने रत्नागिरीत या मंदिराची स्थापना करण्यात आली. पंढरपूरच्या परंपरेनुसार येथेही विविध धार्मिक नित्योपचार पार पाडले जातात. यंदाच्या यात्रेनिमित्त परटवणे येथील कै. दाजी नाचणकर व कै. अप्पा नाचणकर संस्थापित पायी दिंडी आज सकाळी ११ वाजता मंदिरात दाखल होणार आहे.
मध्यरात्री रथोत्सवाची मिरवणूक पार पडल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास श्री तृणबिंदूकेश्वर मंदिरात हरिहरेश्वराची भेट होईल. त्यानंतर द्वादशीची काकड आरती करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने नगरप्रदक्षिणा होणार असून, या धार्मिक सोहळ्यांसाठी मंदिर परिसरात वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
धार्मिक यात्रेसोबत खरेदीचा उत्सव; बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
कार्तिकी एकादशीची जत्रा रत्नागिरीकरांसाठी केवळ धार्मिक किंवा पारंपरिक उत्सव नसून, खरेदीचाही मोठा सोहळाही ठरतो. या यात्रेनिमित्त मुंबईपासून गुजरातपर्यंत तसेच विविध ठिकाणांहून व्यापारी आणि व्यावसायिक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरगावच्या व्यावसायिकांनी काल रात्रीपासूनच बाजारपेठेत आपापली दुकाने थाटण्यास सुरुवात केली. तर रात्रीपासूनच खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस रत्नागिरीच्या व्यापारी वर्गासाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रत्यक्ष कार्तिकी एकादशी शनिवारी असल्याने आज खरेदीचा मोठा जोर राहण्याची अपेक्षा आहे. रविवारीही ग्राहकांची मोठी गर्दी होऊन विक्रीत वाढ होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साड्या, कपडे, भांडी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीला पसंती
कार्तिकी जत्रेत साड्या, कपडे, भांडी, सौंदर्यप्रसाधने आणि विविध घरगुती वस्तूंची दुकाने सजली आहेत. नेहमीच्या बाजारपेठेत सहज उपलब्ध न होणाऱ्या अनेक वस्तू एकाच ठिकाणी तुलनेने माफक दरात मिळत असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे मोठा कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे, केवळ हिंदू समाजातील नागरिकच नव्हे, तर मुस्लिम समाजातील नागरिकही आकर्षक दर आणि विविध ऑफर्समुळे मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीची जत्रा सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागाने अधिकच गजबजली आहे.
बस स्टॅन्डपासून गाडीतळापर्यंत बाजारपेठेत दुकानांची रेलचेल
रामआळीपासून सुरू होणारी ही जत्रा आता बस स्टँड पासून गोखले नाका, धनजी नाका, गाडीतळ, काँग्रेस भवन तसेच पऱ्याच्या आळीतील गल्लीपर्यंत विस्तारली आहे. बाजारपेठेतील जागा मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उभारली आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वत्र खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिकांनी शुक्रवारपासूनच मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली, तर ग्रामीण भागातील नागरिक आजपासून जत्रेत सहभागी होत आहेत. अनेक नागरिक वर्षभर या जत्रेची प्रतीक्षा करतात. आदल्या किंवा त्याच दिवशी खरेदी उरकून कुटुंबासह जत्रेचा आनंद लुटण्याचा अनेकांचा ठरलेला दिनक्रम असतो. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी ही जत्रा आनंदाची पर्वणी ठरते. आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी, कुटुंबीयांसह बाजारपेठेत फेरफटका आणि विविध दुकानांना भेट देण्यातून नागरिक जत्रेचा मनमुराद आनंद घेतात.
या यात्रेमुळे बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते, तर स्थानिक नागरिकांनाही विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी मिळते. त्यामुळे कार्तिकी एकादशीची जत्रा धार्मिक परंपरेसोबतच रत्नागिरीच्या अर्थकारणाला चालना देणारा आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव ठरत आहे.
दरम्यान, यात्रेसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनेही आवश्यक नियोजन केले आहे. मंदिरातील धार्मिक सोहळे, विठ्ठलभक्तीचा गजर आणि बाजारपेठेतील खरेदीची लगबग यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


