(पिंपरी चिंचवड / पुणे)
पिंपरी चिंचवड शहरातील चोविसावाडी फायर स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी व्यायाम करत असताना अग्निशामक दलातील जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. तनिष्क पार्क सोसायटी, चर्होली) असे मृत जवानाचे नाव आहे.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राऊत नेहमीप्रमाणे फायर स्टेशनमधील जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांनी “थोडा वेळ आराम करतो” असे सांगून विश्रांती घेतली. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे अग्निशामक दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

