(गुहागर / वृत्तसंस्था)
महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वरच्या इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थी राज भोसले याने कबड्डीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय कबड्डी संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या निवडीबद्दल महाविद्यालयात त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
स्पोर्ट्स अकॅडमी डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वरच्या १० खेळाडूंच्या मुलांच्या कबड्डी संघाने सहभाग नोंदवला होता. स्पर्धेनंतर कोकण विभागीय संघासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत राज भोसले सहभागी झाला.
व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तरुणीला ब्लॅकमेल
निवड चाचणीतील त्याच्या कामगिरीच्या आधारे राज भोसलेची कोकण विभागीय कबड्डी संघासाठी निवड करण्यात आली. हा निवड झालेला कोकण विभागीय संघ आगामी आंतरविभागीय विद्यापीठ स्तरावरील कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
राज भोसलेच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक प्रा. औदुंबर पाटकर यांनीही राज भोसलेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्या मेहनतीचे आणि क्रीडा कौशल्याचे कौतुक केले. राज भोसलेच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


