(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
इन्स्टाग्रामवर केवळ काही मिनिटे रील्स पाहण्याच्या उद्देशाने सुरू केलेले स्क्रोलिंग अनेकदा तासन्तास सुरू राहते. लाईक्स, कमेंट्स, शेअर्स, नोटिफिकेशन्स आणि सतत बदलणारा कंटेंट यामुळे अॅप पुन्हा-पुन्हा उघडण्याची सवय वाढत असून, तरुणाई सरासरी दिवसभरातील २ तास ४० मिनिटे वाया घालवत असल्याची माहिती डेटा ग्लोबल डिजिटल रिसर्च प्लॅटफॉर्म ‘डेटा रेपोर्टल’च्या २०२६ मधील अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, एक सक्रिय युजर्स दर आठवड्याला सरासरी १८ तास ३६ मिनिटे सोशल मीडियावर घालवत आहे.
भारतामध्ये इन्स्टाग्रामचा वापर किती मोठ्या प्रमाणावर आहे, याचीही आकडेवारी अहवालातून समोर आली आहे. ‘डेटा रेपोर्टल’नुसार, २०२५ पर्यंत देशात इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या ४८ कोटींपेक्षा जास्त होती. तसेच ‘मेटा-आयपीएसओएस’च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८९ टक्के जेन वापरकर्त्यांनी ते दररोज रील्स पाहत असल्याचे सांगितले. याच सर्वेक्षणातील ८५ टक्के महिलांनीही दररोज रील्स पाहत असल्याचे नमूद केले. भारतातील २३ शहरे आणि ग्रामीण भागांतील ४,००० हून अधिक लोकांचा या सर्वेक्षणात समावेश होता.
तंत्रज्ञान धोरणविषयक थिंक टँक ‘ए२८ं सेंटर’च्या माहितीनुसार, भारतीय दररोज सरासरी ३.२ तास सोशल मीडिया अॅप्सवर घालवतात. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याची सुरुवात काही मिनिटांपासून होऊन ती दीर्घकाळ स्क्रोलिंगमध्ये कशी बदलते, याकडे लक्ष वेधले जात आहे.
इन्स्टाग्राम वापरताना युजरच्या आवडी आणि त्याच्या मागील अॅक्टिव्हिटीच्या आधारे त्याला कंटेंट दाखवला जातो. या प्रक्रियेला ‘अल्गोरिदम’ म्हणतात. त्यामुळे वापरकर्त्याला आवडणारा कंटेंट सातत्याने समोर येत राहतो. प्रत्येक नवीन रीलमध्ये काहीतरी नवीन, मजेदार किंवा आवडीचे पाहायला मिळेल, ही अपेक्षाही पुढील रील पाहण्यास प्रवृत्त करते.
इन्स्टाग्राम उघडल्यानंतर फक्त ५ मिनिटे रील्स पाहायच्या आहेत, असे ठरवणारा युजर एका रीलनंतर दुसरी आणि तिसरी रील पाहत राहतो. या प्रक्रियेत एक तास कधी निघून जातो, याची जाणीवही अनेकदा होत नाही. लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आणि नोटिफिकेशन्समुळे अॅप वारंवार तपासण्याची सवय आणखी वाढते. त्याचबरोबर ट्रेंड किंवा अपडेट्स चुकण्याची भीतीही लोकांना पुन्हा-पुन्हा इन्स्टाग्राम उघडण्यास प्रवृत्त करते.
सतत रील्स पाहिल्यामुळे मेंदूला अतिशय वेगाने बदलणाऱ्या कंटेंटची आणि छोट्या-छोट्या व्हीडीओंची सवय लागू शकते. परिणामी, दीर्घकाळ एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. अशा प्रकारे काही मिनिटांच्या रील्सपासून सुरू होणारे स्क्रोलिंग दीर्घकाळ चालणाऱ्या सोशल मीडिया वापरामध्ये बदलत असल्याचे या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव दिसून येते.


