(ठाणे / वार्ताहर)
ठाण्यातील उबाठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल पोलिसांनी कर्नाळा येथील जंगलातून जप्त केले असून, अटकेतील आरोपी निखिल यादव याचा मोबाईलही याच परिसरातून हस्तगत करण्यात आला आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांनी हत्या केल्यानंतर पिस्तुल व धारदार हत्यार कर्नाळा जंगलात फेकल्याची माहिती तपासादरम्यान दिल्यानंतर एसआयटी पथकाने मंगळवारी सायंकाळी दोन्ही आरोपींना सोबत घेऊन जंगलात शोधमोहीम राबवली.
कर्नाळा जंगलात पोलिसांनी पिस्तुल आणि निखिल यादवचा मोबाईल शोधून काढला; मात्र बराच शोध घेऊनही हत्यार मिळाले नाही. जप्त करण्यात आलेले पिस्तुल आणि मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. पूर्णेकर यांच्यावर गोळी झाडण्यासाठी याच पिस्तुलाचा वापर झाला होता का, हे फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. तसेच निखिलच्या मोबाईलमधून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी समोर येण्यास मदत होईल, अशी माहिती एसआयटीने दिली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला असतानाही गुन्ह्यात वापरलेले हत्यार पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे पिस्तुल जप्त होणे हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तरुणीला ब्लॅकमेल
या प्रकरणात पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि एक अज्ञात मारेकरी अद्याप फरार आहेत. तपासातून या हत्येत एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एसआयटी पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा येथील जंगलाजवळ असलेल्या एका डेअरी फर्ममधून निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, निखिल यादव याने प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, तर नितेश पवार याने त्यांच्या मानेवर आणि पाठीवर अत्यंत निर्घृणपणे वार केले होते. अटकेनंतर चौकशीदरम्यान दोघांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल आणि धारदार हत्यार कर्नाळा जंगलात फेकल्याचे सांगितले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी नितेश पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळील एका वडापावच्या गाडीवर कामाला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने पप्या शिंदे यालाही यापूर्वीच अटक केली आहे.
या हत्येचा मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया उर्फ टल्ली असल्याचे तपासातून समोर आले असून तो अद्याप फरार आहे. हल्ल्याच्या वेळी एका आरोपीने हेल्मेट घातले असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
ठाणे पोलिसांनी दोघांविरोधात लूकआउट नोटीसही जारी केली असून, राज्याबाहेरील सर्व रेल्वे स्थानके आणि राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर त्यांच्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पाचही आरोपींनी आपल्या दुचाकी समतानगर येथे सोडून दिल्या होत्या. त्यानंतर सर्व आरोपी अल्टो कारमधून कळवा-मुंब्रा बायपासमार्गे कल्याण फाटा येथे गेले. तेथे निखिल यादव आणि नितेश पवार हे दोघे कारमधून उतरून गोव्याच्या दिशेने फरार झाले. तर संतोष कनोजिया आणि हेल्मेटधारी आरोपी कारमधून बदलापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.


