(रत्नागिरी / वार्ताहर)
पाली ते नाणीज मार्गावर भरधाव दुचाकी चालवताना नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाणीज येथील जुन्या मठाजवळ स्पीड ब्रेकरसाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या बॅरलला दुचाकीची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या विश्वास रामदास रसाळ (वय ४३, रा. नाणीज, ता. जि. रत्नागिरी) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास रसाळ हे स्वतःच्या मालकीच्या एमएच ०८ पी २०५८ क्रमांकाच्या दुचाकीवरून पालीहून नाणीजच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान अतिवेगाने दुचाकी चालविल्याने नाणीज जुन्या मठाजवळ स्पीड ब्रेकरसाठी लावलेल्या बॅरलला दुचाकीची धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी रसाळ यांना तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्यानंतर कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघातप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक २९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


