(ठाणे / वृत्तसंस्था)
डोंबिवलीतील शिरढोण परिसरात मैत्रीचा गैरफायदा घेत एका विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचे ७० हून अधिक व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने नंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहणाऱ्या कुणाल शिंगाडे याची संबंधित विवाहितेशी मैत्री होती. या मैत्रीचा फायदा घेत पुढे त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिचे ७० हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. काही काळानंतर महिलेने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच भेटण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीने महिलेचे फोटो तिच्या पतीला पाठवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आरोपीकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळल्यानंतर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुणाल शिंगाडे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.


