[ विशेष /प्रतिनिधी ]
‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “वा! किती सुंदर स्टेशन झालंय…” अशी प्रतिक्रिया देत अनेकांनी नव्या रूपातील रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे कौतुक केलेल्या सजावटीच्या छताचा काही भाग सोमवारी मध्यरात्री पुन्हा कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीही अशाच प्रकारे छताचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता ही केवळ तांत्रिक त्रुटी आहे की कामातील गंभीर निष्काळजीपणा, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दिवसा अथवा गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना ओढवली असती, अशी भीती व्यक्त होत आहे. रेल्वेसारख्या चोवीस तास वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी अशा घटना वारंवार घडणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. कोकणातील मुसळधार पाऊस, दमदार वारे आणि किनारी हवामानाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन अशा प्रकारची कामे नियोजनबद्ध पद्धतीने होणे अपेक्षित असते. संरचनात्मक सुरक्षितता, मजबूत अँकरिंग, गंजप्रतिबंधक साहित्याचा वापर आणि गुणवत्तेची काटेकोर तपासणी ही मूलभूत अभियांत्रिकी तत्त्वे आहेत. अशा परिस्थितीत सजावटीच्या छताचा भाग दुसऱ्यांदा कोसळणे, हे कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण करणारे आहे.
या प्रकरणामुळे कामाची अंमलबजावणी, देखरेख आणि गुणवत्ता नियंत्रण या तिन्ही स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ आकर्षक दर्शनी रूप देण्याच्या नादात सुरक्षेशी तडजोड झाली का? उद्घाटनाच्या घाईत काम पूर्ण करण्याचा दबाव होता का? संबंधित अधिकाऱ्यांनी गुणवत्तेची अंतिम तपासणी केली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत. जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशातून उभारण्यात आलेल्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे. त्यामुळे या घटनेची केवळ विभागीय चौकशी न करता स्वतंत्र तज्ज्ञांकडून संपूर्ण संरचनेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदार, सल्लागार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आहे. अशा ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणताही प्रकल्प मोठा असू शकत नाही. विकासाचा खरा अर्थ केवळ चकचकीत सजावट नसून टिकाऊ, सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे हा आहे. दोनदा छताचा भाग कोसळल्यानंतरही जर संबंधित यंत्रणा केवळ औपचारिक स्पष्टीकरणांवर समाधान मानत असेल, तर तो प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ ठरेल. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची ठोस हमी देणे हीच आता प्रशासनाची खरी कसोटी ठरणार आहे.
विकासाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह
“वा! किती सुंदर स्टेशन झालंय…” अशी प्रतिक्रिया देत अनेकांनी नव्या रूपातील रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे कौतुक केले. आधुनिक वास्तुरचना, आकर्षक प्रकाशयोजना आणि देखण्या सजावटीने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनावेळी विकासाचे मोठमोठे दावे करण्यात आले, तर स्थानकाला ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेचा आदर्श नमुना म्हणून सादर करण्यात आले. मात्र, दर वर्षी या चकचकीत रूपामागील वास्तव समोर येऊ लागले आहे. सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या स्थानकात पावसाचे पाणी गळणे, छताच्या संरचनेबाबत प्रश्न निर्माण होणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होणे, या बाबींमुळे विकासाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “एका वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले, व्यासपीठावरून विकासाची ग्वाही देण्यात आली; पण दरवर्षी मान्सूनमध्ये जर स्थानकाची अशी अवस्था होत असेल, तर या कोट्यवधी रुपयांच्या कामाचा दर्जा नेमका काय होता?” हेच दरवर्षी आता नागरिकांना पाहायला मिळत आहे.
हा विकासाचा ‘डेकोरेशन पीस’ आहे की….
कोट्यवधी रुपयांचा खर्च, झगमगाटात झालेले उद्घाटन, ‘विमानतळाच्या धर्तीवरील स्थानक’ अशा घोषणांचा गजर… सगळं काही अगदी चित्रातल्यासारखं! फक्त एकच किरकोळ अडचण राहिली ती, कोकणात पाऊस पडतो, वारा सुटतो आणि छत टिकायला हवं, याचा बहुधा आराखड्यात विसर पडला असावा! त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात छतच जणू ‘उद्घाटनानंतरची पत्रकार परिषद’ घेत खाली येत असल्याचे चित्र आहे. दोनदा छताच्या संरचनेबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतरही जर संबंधित यंत्रणा केवळ दुरुस्तीची मलमपट्टी करत असेल, तर हा विकासाचा ‘डेकोरेशन पीस’ आहे की सार्वजनिक मालमत्ता, असा सवाल उपस्थित होत आहे. उद्घाटनाच्या फिती कापण्याइतकीच जबाबदारी कामाच्या गुणवत्तेचीही असते, याची आठवण करून देण्याची वेळ आता आली आहे. आता तरी या प्रकरणात जबाबदारी निश्चित होणार का, दोषींवर कारवाई होणार का, की पुढच्या पावसाची आणि पुढच्या छताच्या प्रतीक्षेतच सर्व काही सुरू राहणार? या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ संबंधित यंत्रणांवर आली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

