लग्नाचे आश्वासन देऊन १४ महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद माजिन याला संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेला हा आरोपी २० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतात परतला. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), परराष्ट्र मंत्रालय (MEA), केंद्रीय गृह मंत्रालय (MHA), इंटरपोल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकाने यूएईमध्ये आरोपीचा ताबा घेतला.
महाराष्ट्र पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, मोहम्मद माजिन याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप आहे. याच माध्यमातून त्याने संबंधित तरुणीची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, आरोपीने अशाच पद्धतीने आणखी १३ महिलांना लग्नाचे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढल्याचे उघड झाले. या महिलांचेही शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याशिवाय महिलांसोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, कारवाईची शक्यता लक्षात येताच मोहम्मद माजिन परदेशात पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयकडे मदत मागितली. त्यानुसार सीबीआयच्या नवी दिल्ली येथील नॅशनल सेंट्रल ब्युरोने (NCB) इंटरपोलच्या माध्यमातून आरोपीविरोधात रेड नोटीस जारी केली. इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय संपर्क यंत्रणेच्या मदतीने त्याचे ठिकाण शोधण्यात आले. त्यानंतर यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात सक्षम न्यायालयात यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यूएईमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथील प्रशासनाने आरोपीला भारतात पाठविण्यास परवानगी दिली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक यूएईमध्ये पोहोचले आणि तेथील अधिकाऱ्यांकडून आरोपीचा ताबा घेतला. २० नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला भारतात आणण्यात आले. भारतात आणल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे एस्कॉर्ट पथक आरोपीला कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन पोहोचले.
दरम्यान, परदेशात पळून गेलेल्या फरार आरोपींना भारतात परत आणण्याच्या मोहिमेतही सीबीआयला यश मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या आकडेवारीनुसार, २०१९ पासून आतापर्यंत इंटरपोलच्या माध्यमातून ३०० हून अधिक फरार आणि वांछित आरोपींना भारतात परत आणण्यात आले आहे. त्यापैकी २०२६ या वर्षात आतापर्यंत ७४ आरोपींचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.
भारतातील इंटरपोलचे नॅशनल सेंट्रल ब्युरो म्हणून सीबीआय देशभरातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर वांछित आरोपींचा शोध, अटक आणि त्यांना भारतात परत आणण्याचे काम करते. परदेशात लपून बसलेल्या अन्य आरोपींनाही भारतात आणण्यासाठी सीबीआय आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या संपर्कात असून, त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे.


