(राजापूर/रत्नागिरी प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात घडलेल्या दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, तर पंधरा वर्षीय माहिरा अद्याप बेपत्ता आहे. एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दुर्घटनेत स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार रात्रंदिवस शोधमोहीम राबवत असताना, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कुटुंबीयांच्या भेटीसाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या कथित उदासीनतेमुळे संतापलेल्या नातेवाइकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः बोटीतून शोधमोहिमेत सहभागी
‘एखाद्या मंत्र्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या मुला-मुलीवर अशी वेळ आली असती, तर प्रशासन इतकेच सुस्त राहिले असते का?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत नातेवाइकांनी व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर घणाघाती प्रहार केला आहे. एका सामान्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांना धीर देण्यासाठी आणि मदतीचा हात देण्यासाठी जबाबदार अधिकारी कुठे आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रविवारी खाडीपात्रात बुडालेल्या तीन बालकांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शवविच्छेदनाच्या प्रक्रियेतही स्थानिकांनी सहकार्य केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र, संकटाच्या काळात स्थानिकांनी पुढाकार घ्यायचा, शोधमोहीमेत जीवाचे रान करायचे आणि प्रशासनाने केवळ प्रक्रियेसाठी सहकार्य मागायचे, तर प्रशासनाच्या जबाबदारीचे नेमके काय, असा सवाल नातेवाइकांनी केला आहे.
‘तुमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही येणार आणि पुन्हा स्थानिकांकडूनच सहकार्य मागणार; मग आम्ही तुम्हाला कसले सहकार्य करायचे?’ अशा शब्दांत नातेवाइकांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या प्रश्नातून केवळ रोषच नव्हे, तर संकटग्रस्त कुटुंबाला प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या संवेदनशीलतेचा अभाव असल्याची भावना व्यक्त होत आहे. तीन बालकांवर अंत्यसंस्कार झाले असले, तरी भाटकर कुटुंबाची प्रतीक्षा संपलेली नाही. माहिराचा शोध अद्याप लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर चिंतेत आहे. खाडीपट्ट्यातील ग्रामस्थ, मच्छीमार आणि स्थानिक बांधव अन्न-पाण्याचीही पर्वा न करता रात्रंदिवस शोधमोहिमेत सहभागी होत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक सर्वस्व पणाला लावत असताना तिच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठीही संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी यावे, ही किमान अपेक्षा आहे. मात्र, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि तलाठी यांच्यापैकी कोणीही भेटीसाठी आले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
‘असे अधिकारी आम्हाला नकोत’; शासनाकडे थेट मागणी
प्रशासनाच्या कथित असंवेदनशीलतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मोबीन युसुफ भाटकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे अशा अधिकाऱ्यांबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘असे अधिकारी आमच्या इथे नकोत,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. आपत्तीच्या काळात प्रशासनाची खरी कसोटी लागते. कागदोपत्री प्रक्रिया आणि कार्यालयीन औपचारिकता यापलीकडे जाऊन संकटग्रस्त कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणे, प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वास देणे, ही यंत्रणेचीही जबाबदारी आहे. तीन बालकांचा मृत्यू आणि चौथ्या मुलीचे बेपत्ता असणे, या असह्य प्रसंगात भाटकर कुटुंबाला केवळ शोधमोहिमेचीच नव्हे, तर मानसिक आधाराचीही गरज आहे.


