( रत्नागिरी /प्रतिनिधी )
वंशाच्या दिव्याच्या अट्टहासापोटी पोटच्या गोळ्याचा गर्भातच जीव घेण्याच्या क्रूर मानसिकतेला कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अद्यापही आळा बसलेला नाही, हे साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणाच्या तपासातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या धक्कादायक प्रकरणाचा तपास करणाऱ्या देवरुख पोलिसांनी कोल्हापूर कनेक्शन खणून काढत पीडित महिलेच्या सख्ख्या बहिणीला अटक केली असून, तिचा मेव्हणा मात्र अद्याप फरार आहे. दुसरीकडे, मृत्यूच्या दारातून परतलेल्या संबंधित महिलेला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आज शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका दांपत्याने संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. विजय नारकर यांच्या दवाखान्यात बेकायदेशीररीत्या १६ ते १८ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात केला होता. या क्रूर प्रक्रियेदरम्यान महिलेला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सखोल तपासणीत हा प्रकार स्त्रीभ्रूणहत्येचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर देवरुख पोलिसांनी डॉ. नारकर याच्यासह पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून डॉक्टर आणि पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
या गुन्ह्यामागे मोठे आंतरजिल्हा रॅकेट सक्रिय असल्याच्या संशयावरून देवरुख पोलिसांचे एक विशेष पथक कोल्हापूरला रवाना झाले होते. या तपासादरम्यान, या अमानवी कृत्यात पीडित महिलेची बहीण आणि मेव्हणा यांचाही थेट सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत बहिणीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तिचा पती (पीडितेचा मेव्हणा) गुन्हा उघडकीस आल्यापासून फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित महिलेची प्रकृती सुधारल्याने तिला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, तिच्यावरही कायदेशीर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
कायद्याचा धाक केव्हा बसणार?
स्त्रीभ्रूणहत्या हा केवळ कायद्याने गंभीर गुन्हा नसून, समाजाच्या संवेदनशीलतेला आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. मुलगा-मुलगी असा भेदभाव करत गर्भातील कळी खुडण्याच्या या विकृत प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी शासनाने अत्यंत कठोर कायदे केले आहेत. तरीही, नातेवाईकांच्याच संगनमताने आणि पैशांच्या हव्यासापोटी डॉक्टरांकडून असे काळे धंदे राजरोसपणे सुरू असल्याने समाजमनातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा उपविभागाचे उपअधीक्षक सुरेश कदम आणि देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, फरार मेव्हण्याच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.


