(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यांमधील राजापूर तालुक्यातील नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय माहिरा जुनेद भाटकर हिचा मृतदेह पाच दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. या दुर्घटनेत यापूर्वीच तीन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील चार मुलांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नाणार परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बेपत्ता माहिराचा शोध लागेपर्यंत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या मोहिमेवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत शोधकार्याला गती देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या मोहिमेत महत्त्वाचे ठरले आहे.
हेही वाचा : नाणार दुर्घटना : बेपत्ता मायराच्या शोधासाठी शोधमोहीम तीव्र; एसपी नितीन बगाटे स्वतः मैदानात
११ ऑक्टोबर रोजी नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या भाटकर कुटुंबावर काळाने घाला घातला. जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर मुलांसमवेत उदरनिर्वाहासाठी खाडीपात्रात गेल्या होत्या. पालक कामात व्यस्त असताना खाडीकिनारी असलेली मुले अचानक खोल पाण्यात बुडू लागली. पाण्याची खोली आणि तळाशी असलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलांचा आक्रोश ऐकून पालक आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र अन्य चार भावंडांना वाचविता आले नाही. या दुर्घटनेनंतर नाटे सागरी पोलीस, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. पहिल्याच दिवशी मोहम्मद जुनेद भाटकर, जुहेरिया जुनेद भाटकर आणि बुशिरा जुनेद भाटकर या तिघांचे मृतदेह मिळाले. मात्र, माहिरा बेपत्ता असल्याने तिचा शोध सुरूच ठेवण्यात आला होता. अखेर सलग पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर तिचा मृतदेह खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शोधमोहिमेच्या केवळ प्रशासकीय सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः बोटीतून खाडीपात्रात जाऊन शोधकार्यात सहभाग घेतला. बेपत्ता मुलीचा शोध अधिक व्यापक पातळीवर घेण्यासाठी त्यांनी विविध यंत्रणांची मदत उपलब्ध करून देण्यावर भर दिला. या मोहिमेसाठी कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टर, रत्नागिरी पोलीस नौका विभागाचे जवान, कायकिंग बोट, मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथक, पोलीस अधिकारी-अंमलदार, सागरी सुरक्षा विभागाचे होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली होती. खाडीपात्राचे स्वरूप, पाण्याची खोली आणि कांदळवनाचा परिसर लक्षात घेता विविध पथकांच्या माध्यमातून शोधकार्य करण्यात आले. बगाटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवले आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या व्यापक राबविण्यात आलेल्या शोधकार्याला यश आले आहे.
वाचा: चार चिमुकल्यांवर संकट; तरीही प्रशासनाला पाझर फुटेना! भाटकर कुटुंबीयांच्या नातेवाइकांचा संताप
अशा दुर्घटनेत आपल्या चार मुलांना गमावलेल्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. या काळात शोधकार्य सुरू ठेवण्याबरोबरच कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि त्यांना धीर देणेही महत्त्वाचे ठरते. नितीन बगाटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेत सहभाग घेतला आणि विविध यंत्रणांना सक्रिय ठेवण्यावर भर दिला होता. त्यांच्या या प्रत्यक्ष सहभागातून आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केवळ प्रशासकीय देखरेखीपुरती मर्यादित नसून, घटनास्थळी समन्वय राखणे आणि नागरिकांच्या दुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर माहिराचा मृतदेह मिळाल्याने शोधकार्याचा एक टप्पा पूर्ण झाला असला, तरी या दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर ओढवलेले दुःख अपार आहे. चार भावंडांच्या मृत्यूने नाणार-इंगळवाडी परिसर शोकसागरात बुडाला आहे. खाडीपात्रात काम करताना पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरजही या घटनेने दाखवून दिली आहे.
वाचा आवर्जून: नाणार दुर्घटना : बेपत्ता मायराच्या शोधासाठी शोधमोहीम तीव्र; एसपी नितीन बगाटे स्वतः मैदानात


