(पुणे)
मंगेशकर कुटुंबीयांकडून पुण्याजवळ उभारल्या जाणाऱ्या भव्य आणि अत्याधुनिक रुग्णालयाच्या प्रकल्पाला आता नवे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचे नाव आता ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे भूमिपूजन १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयही यावेळी सहभागी होणार आहेत.
सुरुवातीला या प्रकल्पाला केवळ लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अलीकडील घडामोडींनंतर आशा भोसले यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून नावात त्यांचाही समावेश करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी घेतला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले की, आशाताई स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या, परंतु अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला असून, हा प्रकल्प त्यांच्या दोघींच्या कार्याला आणि समाजसेवेच्या वारशाला साजेसा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, “दु:ख विसरून कर्तव्य पार पाडावे ही लतादीदींची शिकवण आहे. त्याच विचारातून आम्ही हा प्रकल्प पुढे नेत आहोत.” या पार्श्वभूमीवर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी पांढरे कपडे परिधान करून यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्याजवळील नांदोशी येथे सुमारे ४० एकर जागेत हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सुरवातीला हजार व टप्प्याटप्प्याने ३ हजार खाटांचे मल्टीस्पेशालिटी, धर्मादाय रुग्णालय उभे राहणार आहे, या प्रकल्पामध्ये विविध विशेष तज्ज्ञ वैद्यकीय विभाग, आधुनिक उपचार सुविधा आणि रुग्णांसाठी उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सोय म्हणून धर्मशाळाही उभारली जाणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी हा प्रकल्प समाजोपयोगी उपक्रम म्हणून पुढे आणला असून, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर राहणार आहे. या भव्य प्रकल्पामुळे पुणे परिसरातील आरोग्य सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

