(जयपूर)
राजस्थानच्या गंगानगर येथील मनिका विश्वकर्मानं मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा प्रतिष्ठेचा किताब पटकावत आपल्या नावावर एक मोठं यश संपादन केलं आहे. जयपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या राष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत तिनं देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत मुकुट जिंकला. आता ती थायलंडमध्ये होणाऱ्या ७४व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा या वर्षाअखेरीस होणार आहे.
मॉडेलिंगपासून समाजसेवेपर्यंतचा प्रवास
मनिका विश्वकर्मा ही सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असून गेल्या काही वर्षांपासून ती आपल्या मॉडेलिंग कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. याआधी २०२४ मध्ये ती मिस युनिव्हर्स राजस्थान म्हणून निवडली गेली होती. शिक्षणासोबतच सौंदर्य क्षेत्रातील तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ती आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.
“ही केवळ स्पर्धा नव्हे, आयुष्यभराचा प्रवास”
स्पर्धेनंतर दिलेल्या एका मुलाखतीत मनिकानं आपल्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटलं, “माझा प्रवास माझ्या शहर गंगानगरपासून सुरू झाला. दिल्लीमध्ये येऊन मी या स्पर्धेची तयारी केली. आत्मविश्वास, संयम आणि सततचा सराव या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. ही स्पर्धा केवळ एक ताज जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर ती व्यक्तिमत्त्व घडवणारी संपूर्ण एक जीवनप्रक्रिया आहे.” तिनं यशामागे योगदान देणाऱ्या मार्गदर्शकांचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
केवळ सौंदर्यवती नव्हे, तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या मनिकाचं व्यक्तिमत्त्व केवळ सौंदर्यापुरतं मर्यादित नाही. ती ‘न्यूरोनोव्हा’ या संस्थेची संस्थापक असून ADHD आणि न्यूरोडायव्हर्जन्स यासारख्या मानसिक आरोग्यविषयक मुद्द्यांवर जनजागृती करत आहे. तिच्या अष्टपैलूतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे तिनं परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘बिमस्टेक सेवोकोन’ परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ती शास्त्रीय नृत्यांगना, चित्रकार असून ललित कला अकादमी व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून गौरवण्यात आली आहे. शिवाय, ती राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट राहिली आहे आणि एक प्रभावशाली वक्ता म्हणूनही ओळखली जाते.

