(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या भाटकर कुटुंबातील तीन चिमुकल्यांना सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. तीन मुलांच्या मृत्यूचे दुःख पचवायचे, की अद्याप बेपत्ता असलेल्या पंधरा वर्षीय माहिराचा शोध लागण्याची प्रतीक्षा करायची, अशा असह्य द्विधा मनःस्थितीत भाटकर कुटुंब सापडले आहे. दरम्यान, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः बोटीतून शोधमोहिमेत सहभाग घेतला.
रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी जुनेद भाटकर हे आपल्या पाच मुलांसह नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाचही मुले खोल पाण्यात बुडू लागली. या प्रसंगात एका बालिकेला वाचवण्यात यश आले; मात्र अन्य तीन बालकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शोधमोहिमेदरम्यान रविवारी रात्री उशिरा मोहम्मद (वय ६), जुहेरिया (वय ९) आणि बुशिरा (वय ११) या तिघांचे मृतदेह हाती लागले. सोमवारी सकाळी या तिन्ही बालकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांना एकाच वेळी निरोप देण्याची वेळ आल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
डोळ्यांसमोर मुलांवर संकट कोसळल्याचा प्रसंग आणि त्यानंतर तीन मुलांचे मृतदेह हाती येण्याचे दुःख, या आघाताने जुनेद भाटकर आणि त्यांच्या पत्नी हिना भाटकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलांच्या अंत्यसंस्कारानंतरही कुटुंबाची वेदना संपलेली नाही. पंधरा वर्षीय माहिरा जुनेद भाटकर ही मुलगी अद्याप बेपत्ता असल्याने तिच्या शोधाकडे कुटुंबीयांचे डोळे लागले आहेत. नाणार-इंगळवाडी परिसरात या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
बगाटे स्वतः बोटीतून शोधमोहिमेत
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी दुःखद प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या भाटकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बेपत्ता माहिराचा शोध घेण्यासाठी बगाटे यांनी स्वतः बोटीतून खाडीपात्रात शोधमोहीम राबवली. अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदारही या मोहिमेत सहभागी झाले. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने घटनास्थळाच्या परिसरात लहान-मोठ्या बोटींच्या साहाय्याने शोध घेत आहेत. दुर्घटना घडल्यापासून दिवस-रात्र ही मोहीम सुरू असून, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
जलक्षेत्रांमध्ये खबरदारी घेण्याचे आवाहन
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांशी संवाद साधत समुद्रकिनारे, खाडीपात्रे, नद्या आणि अन्य जलक्षेत्रांमध्ये वावरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पाण्याची खोली, प्रवाह आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने अशा ठिकाणी दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे. धोकादायक जलक्षेत्रांमध्ये मुलांना एकटे सोडू नये किंवा त्यांना एकट्याने अशा ठिकाणी जाऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने नाणार-इंगळवाडीवर शोककळा पसरली असताना, बेपत्ता माहिरा सुखरूप सापडावी, यासाठी संपूर्ण परिसरातील नागरिक प्रार्थना करीत आहेत. तिच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


