(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चोरवणे येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. चित्रकला स्पर्धेत आराध्या शशिकांत गीते हिने प्रथम क्रमांक, तर निबंध स्पर्धेत आर्वी राजेंद्र पडिलकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
प्राथमिक व पूर्ण प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आयोजित या स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी हा लहान गट आणि इयत्ता सहावी ते आठवी हा मोठा गट अशा दोन गटांत घेण्यात आल्या होत्या.
यामध्ये चोरवणे शाळेच्या कु. आराध्या शशिकांत गीते हिने चित्रकला स्पर्धेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कु. आर्वी राजेंद्र पडिलकर हिने मोठ्या गटातील निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात भर घातली.
दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


