(लांजा / वार्ताहर)
महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘व्ही रूट्स सोशल फाउंडेशन’चा शुभारंभ लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे कुलदैवतेच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. फाउंडेशनच्या संस्थापिका वर्षा विनायक चव्हाण यांनी महिलांना सक्षम करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे तसेच शिक्षण, आरोग्य आणि जनजागृतीच्या माध्यमातून सामाजिक विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला आहे.
वर्षा चव्हाण यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील विनायक सोमनाथ चव्हाण आणि आई विद्या विनायक चव्हाण यांचे मोलाचे पाठबळ लाभले आहे. आपल्या मूळ गावी सामाजिक कार्याची सुरुवात करताना त्यांनी कुटुंबीय, ग्रामस्थ आणि हितचिंतकांचे आभार मानले.
या शुभारंभप्रसंगी राज्यस्तरीय मान्यता प्राप्त अभिनेते व साईबाबांची भूमिका साकारणारे विनायक खानविलकर, कलावंत विनायक घगवे, संतोष शेट्ये आणि अनिता चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांनी वर्षा चव्हाण यांना सामाजिक कार्याच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महिलांचे सक्षमीकरण, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे आणि ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडविण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस वर्षा विनायक चव्हाण यांनी व्यक्त केला.


