(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभव, गुन्हे तपासातील सखोल कौशल्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता या त्रिसूत्रीच्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत यांना ‘पोलीस उपनिरीक्षक’ (PSI) पदी बढती मिळाली आहे. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) या पदोन्नतीचे आदेश जारी झाले असून, त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलासह नागरिकांमधून कौतुक होत आहे.
राजेंद्र सावंत यांनी यापूर्वी देवरुख, खेड, संगमेश्वर आणि पूर्णगड या भागांत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत २०२३ मध्ये त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होऊन रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर पोलीस चौकीचा कार्यभार सोपवण्यात आला होता. कोकणनगर परिसरात रुजू झाल्यापासून त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून, मात्र तितक्याच संवेदनशीलतेने स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण केले. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी अधिक मजबूत होत असून सर्वसामान्यांच्या मनात पोलीस दलाविषयीचा विश्वास दृढ होण्यास मदत होत आहे. याशिवाय गणेशोत्सव, नवरात्र, रमजान यांसह सर्वच सार्वजनिक सण-उत्सवांच्या काळात शहर परिसरात सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. कर्तव्यनिष्ठा आणि प्रचंड अनुभव पाठीशी असलेल्या या अधिकाऱ्याच्या पदोन्नतीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी आणि कोकणनगर परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय आणि परिणामकारक कामगिरीची यापूर्वीच राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राजेंद्र सावंत यांची प्रतिष्ठेच्या ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्हा’साठी निवड झाली होती. १ मे रोजी (महाराष्ट्र दिनी) त्यांना या मानाच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते. आता या सन्मानापाठोपाठ त्यांना ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदाची बढती मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.
गुन्हे उकल आणि न्यायालयीन यशात सिंहाचा वाटा
फौजदार सावंत यांनी गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही आपले विशेष कौशल्य सिद्ध केले आहे. घरफोडी, चोरी, मारामारी, आर्थिक फसवणूक तसेच महिला अत्याचारासारख्या संवेदनशील गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अनेक गुन्ह्यांतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासोबतच तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण करून त्यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली. परिणामी, त्यांनी तपास केलेल्या अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना कठोर शिक्षा सुनावली गेली.


