(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मजुरीचे पैसे न देता परप्रांतीय मजुरांकडून धमकावून जबरदस्तीने काम करून घेतल्याचा गंभीर प्रकार दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील चिरेखाणीवर उघडकीस आला आहे. सप्टेंबर २०२६ पासून तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत मजुरी न देता काम करून घेतल्याचा आरोप संबंधित ठेकेदारावर करण्यात आला आहे. कामाचा हिशेब करून मजुरीचे पैसे द्या आणि आम्हाला गावी पाठवा, अशी मागणी केल्यानंतर मजुरांना मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सुरेश जयराम राठोड (वय ३८) याच्याविरोधात बेकायदेशीर वेठबिगारीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र फुलचंद बनवासी (वय ३६, मूळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) हे साकुर्डे येथील लाडवाडी परिसरातील राजेश सीताराम दाभेकर यांच्या चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. आरोपी सुरेश राठोड हा तेथे कामगारांकडून काम करून घेत होता. सप्टेंबर २०२६ पासून २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादी आणि साक्षीदार यांना मजुरीचे पैसे न देता जबरदस्तीने चिरेखाणीवर काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. कामाचा पुरेसा अनुभव नसल्याने कामाचा हिशेब करून आमची मजुरी द्या आणि आम्हाला गावी पाठवून द्या, अशी विनंती फिर्यादी व साक्षीदारांनी आरोपीकडे केली. मात्र, त्यांच्या मागणीची दखल घेण्याऐवजी आरोपीने त्यांना मारण्याची धमकी दिली. तसेच धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने चिरेखाणीवर काम करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रामचंद्र बनवासी यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सुरेश जयराम राठोड याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४६, ३५१(२) तसेच बंधमजुरी पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ च्या कलम १६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजुरीचे पैसे न देता काम करून घेणे, काम सोडून गावी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर धमकावणे आणि इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडणे, हे आरोप केवळ कामगारांच्या आर्थिक शोषणापुरते मर्यादित नसून त्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावरही घाला घालणारे आहेत. विशेषतः रोजगाराच्या शोधात परराज्यातून कोकणात येणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिरेखाणींवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची नोंदणी, त्यांना दिली जाणारी मजुरी, कामाच्या अटी आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची यंत्रणा यांची संबंधित विभागांनी तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा रोजगाराच्या नावाखाली मजुरांचे शोषण सुरूच राहण्याची भीती आहे. वेठबिगारीचे आरोप गंभीर असल्याने संबंधित चिरेखाणीची मालकी, कामगारांची संख्या, थकीत मजुरी आणि इतर कामगारांनाही अशाच प्रकारे काम करण्यास भाग पाडले जात होते का, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे.


