(रत्नागिरी /चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील रावळगाव शिंदेवाडी येथे २१ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या चुलीच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. कुमारी आसावरी महेंद्र शिंदे (वय २१, रा. रावळगाव शिंदेवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसावरी हिने २७ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या चुलीच्या खोलीतील छताच्या लोखंडी सी-चॅनेलला नायलॉनच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी तिला तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. तरुणीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


