(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपासून फिरत असलेल्या एका मनोरुग्णाच्या आक्रमक वर्तनामुळे प्रवासी व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा मनोरुग्ण अचानक कोणाच्याही अंगावर धावून जात असल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता संपर्क युनिक फाउंडेशन पुढाकाराने आणि प्रशासनाच्या समन्वयातून या मनोरुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून मानवी संवेदनांचे उदाहरण घालून दिले आहे.
संबंधित मनोरुग्ण काही वेळा तर हातात काठी घेऊन प्रवाशांच्या अंगावर धावण्याचे प्रकारही घडल्याने स्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली होती. विशेषतः रेल्वेची वाट पाहणारे प्रवासी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत होती. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज अधोरेखित करत ‘रत्नागिरी २४ न्यूज’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात मनोरुग्णाचा धिंगाणा; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात एक मनोरुग्ण भटकत असल्याची माहिती पोलिसांकडून संस्थेला मिळाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी तातडीने संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला. या माहितीनंतर शिंदे यांनी त्वरित हालचाल करत संबंधित व्यक्तीला रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. यानंतर त्या व्यक्तीची रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक शारीरिक तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित मनोरुग्णाला पुढील उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सचिन शिंदे यांनी यापूर्वीदेखील अशाच प्रकारे समाजात भटकत असलेल्या सुमारे ४५० ते ५०० मनोरुग्णांना शोधून त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्यापैकी अनेक जण उपचारानंतर सामान्य जीवनाकडे परतले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, संपर्क युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या या संवेदनशील कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी सचिन शिंदे यांचे विशेष कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. अशा सामाजिक उपक्रमांमुळे बेघर आणि उपचारांपासून वंचित राहिलेल्या मनोरुग्णांना मदतीचा हात मिळत असून समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

