(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भाजपचा कार्यकर्ता हा सक्षम आहे, त्याला कोणी कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, असा थेट इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या खास बेधडक शैलीत पालकमंत्री उदय सामंत यांना अप्रत्यक्ष टोला लगावत महायुतीतील कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा ठळकपणे मांडला.
एका कार्यक्रमानिमित्त रविवारी नितेश राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट मत मांडले. “लोकसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक कार्यकर्त्याच्या सन्मानाची जबाबदारी आमची आहे. कार्यकर्त्याचा सन्मान राखूनच महायुती झाली पाहिजे,” असे ते ठामपणे म्हणाले.
राणे पुढे म्हणाले, कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नयेत. कार्यकर्ते काही बोलत असतील तर त्यामागे नाराजी आहे, त्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यावी. भाजपच्या कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळते का नाही, हे पाहणे माझे कर्तव्य आहे. कार्यकर्त्याच्या मानसन्मानासाठी आम्ही बोलतो आहोत. त्यांनी पुढे सूचक भाषेत म्हटले, “काही दिवस थांबा, पुढच्या काही दिवसांत काय घडतं ते पाहू. काळजी करण्याचं कारण नाही.” या विधानामुळे रत्नागिरी–सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अल्पसंख्याक आयोगाच्या नोटीसीबाबत विचारल्यास त्यांनी स्पष्ट केले, माझ्या हातात अजून नोटीस आलेली नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करत राहणार. कार्यकर्त्यांचा सन्मान, पक्षातील स्वाभिमान आणि महायुतीतील समतोल या त्रिसूत्रीवर आपली भूमिका स्पष्ट करत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक आणि स्वाभिमानी शैली दाखवून दिली आहे.

