(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील केळये ग्रामपंचायतीत ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सौरभी प्रदीप पाचकुडवे होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे आयोजन करत महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष सौरभी पाचकुडवे यांनी महिला दिन हा केवळ उत्सव नसून स्त्रीच्या अस्तित्वाचा, जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव करणारा दिवस असल्याचे सांगितले. प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत महिलांनी आपल्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली असून घराच्या चौकटीपासून ते आकाशाला गवसणी घालण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर उपस्थितांनी आपली मते मांडत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीची गरज अधोरेखित केली. तसेच समाजात वावरताना विधवा आणि परित्यक्ता महिलांना सन्मानाने व समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पतीच्या निधनानंतर किंवा प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पेलणाऱ्या आणि अथक परिश्रमाने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास उपसरपंच काशिनाथ बापट, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाखरेकर, सदस्या राधिका कळंबटे, ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. गोंडाळ, आरोग्य सेविका ज्योती सातघरे, ग्रामसंघ अध्यक्षा कौसर पावसकर, सचिव वीणा लिंगायत तसेच बचतगटांच्या अध्यक्षा आणि ग्रामपंचायत सदस्य-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

