(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अंमली पदार्थांच्या विळख्यापासून समाजाला, विशेषतः किशोरवयीन मुले व युवकांना मुक्त करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ हा नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक अमली पदार्थविरोधी उपक्रम प्रभावीपणे राबविला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कारवाईला नवे बळ मिळाले आहे.
नागरिक-केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षितता या तत्वांवर आधारित रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विविध विशेष मिशन, प्रकल्प व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरू केले आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘मिशन फिनिक्स’, ज्याचा उद्देश अमली पदार्थांचे सेवन, तस्करी व गुन्हेगारी यांचे समूळ उच्चाटन करत समाजात जनजागृती व पुनर्वसनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवणे हा आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार पोलिस दलाने केला असून, त्या दिशेने दिनांक २५ मे २०२५ पासून ‘मिशन फिनिक्स’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, विविध ठिकाणी छापे टाकून ३२ लाख ७३ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २४ अमली पदार्थ सेवनाचे आणि २४ अमली पदार्थ ताब्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. ब्राऊन शुगर (हेरोईन), चरस, गांजा यांसारख्या विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा समावेश या जप्तीमध्ये आहे.
याच मोहिमेच्या पुढील टप्प्यात दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी, ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत सन २०२० ते २०२५ या कालावधीत दाखल झालेल्या ६५ गुन्ह्यांतील एकूण १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम अमली पदार्थांचा मुद्देमाल सुरक्षितपणे नष्ट केला. हा मुद्देमाल महाराष्ट्र एन्व्हिरो पॉवर लिमिटेड, एम.आय.डी.सी. रांजणगाव (पुणे) येथे नेऊन इन्सिनरेशन पद्धतीने नाश करण्यात आला.
‘मिशन फिनिक्स’ केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता समाजजागृतीवरही भर देत आहे. जिल्हाभरात स्थानिक नाट्यगट व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बस स्थानके, शाळा परिसर, चौक व महाविद्यालयांमध्ये पथनाट्यांचे आयोजन, तसेच नशामुक्त सायकल रॅली, बाइक रॅली, सार्वजनिक रॅली आणि मॅरथॉन यांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत. याशिवाय Instagram, X, Facebook आणि WhatsApp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जनजागृतीपर रील्स, पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करून मोहिमेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येत आहे.
‘नशामुक्त रत्नागिरी’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत, या मोहिमेत युवकांनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच जिल्ह्यात अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती, अडचण किंवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे. अंमली पदार्थांविरोधातील या व्यापक आणि सातत्यपूर्ण लढ्यातून ‘मिशन फिनिक्स’ हे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षम, तंत्रज्ञानस्नेही व समाजाभिमुख पोलीसिंगचे प्रभावी प्रतीक ठरत आहे.

