(रायगड)
देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या काळाबाजारांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जोरदार कारवाई करत ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत तब्बल १०० टन स्फोटकं जप्त केली आहेत. हे स्फोटक सात कंटेनरमध्ये लपवून न्हावा शेवा, मुंद्रा आणि कांडला बंदरांतून भारतात आणले जात होते. या स्फोटकांची आयात मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स, कृत्रिम फुलं आणि प्लास्टिक मॅट्स अशा वस्तूंच्या नावाखाली करण्यात आली होती. मात्र, DRI च्या तपासात लाल शिसे, लिथियम, तांबे ऑक्साईड यांसारख्या अत्यंत धोकादायक रसायनांचा मोठा साठा आढळून आला.
भारतीय स्फोटक नियम 2008 आणि परकीय व्यापार धोरणानुसार, फटाक्यांची किंवा स्फोटकांची आयात प्रतिबंधित प्रकारात मोडते. अशा परिस्थितीत परवाना न घेता स्फोटके आयात करण्याचा हा कट फक्त तस्करीचा नव्हता, तर देशाच्या वाहतूक साखळी आणि सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका ठरू शकला असता. या तस्करीप्रकरणामागे असलेल्या एका एसईझेड युनिटमधील भागीदाराची ओळख DRI ने पटवली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
या कारवाईमुळे फक्त मोठ्या प्रमाणावर स्फोटक तस्करी रोखली गेली नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर निर्माण झालेला गंभीर धोका टाळण्यात DRI ला यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ अंतर्गत अशा आणखी कारवाया होण्याची शक्यता असून, तपास सुरु आहे.