(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल आणि पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी एसटी महामंडळाच्या अनियमित सेवेविरोधात आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पाचल बसस्थानकावर तीव्र आंदोलन छेडले. पाचल व्यापारी संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, रिक्षा चालक-मालक तसेच प्रवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
एसटीच्या अनियमित वेळापत्रकामुळे परिसरातील प्रवासी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आजिवली-कल्याण, येरडवं-मुंबई या गाड्या नियमित सोडण्यात याव्यात, तसेच मलकापूर मार्गे पुणे एसटी सुरू करावी आणि संध्याकाळच्या वस्तीच्या गाड्याही पूर्ववत चालू कराव्यात, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली.
या आंदोलनात पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, पांगरीचे सरपंच अमर जाधव, पाचलचे सरपंच बाबालाल फराससर, उपसरपंच आत्माराम सुतार, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, हातदेचे सरपंच पाटेकर, उपसरपंच बाळा चव्हाण, कोळंबचे सरपंच शाहू पाटेकर, शिवसेना विभाग प्रमुख विलास नारकर, मनसेचे राजेंद्र रेडीज, ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवा पवार, माजी उपसरपंच अफझल पाटणकर, माजी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मंगेश भोसले तसेच मनसेचे रवी नारकर सामाजिक कार्यकर्ते शिरीष सक्रे, पप्पू साळवी, युवा कार्यकर्ते चैतन्य पाथरे, सिद्धेश नारकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या काही काळापासून एसटी सेवा अनियमितपणे चालत असल्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मंत्र्यांचे तसेच आमदारांचे आदेश असतानाही गाड्या बंद ठेवण्यात येत असतील, तर हा प्रकार गंभीर असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आता तत्काळ एसटी सेवा सुरळीत करण्यात यावी, अन्यथा या भोंगळ कारभाराविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पाचल व्यापारी संघटना आणि पांगरीचे सरपंच अमर जाधव यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी राजापूर डेपो व्यवस्थापनाला दिला आहे.

