(पुणे / वृत्तसंस्था)
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने कॅल्शियमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे भरून खायला दिल्याच्या प्रकरणात पुणे न्यायालयाने पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ साधू सपकाळ (४५) असे दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित पत्नी आणि मुलाने साक्ष बदलून आरोपीची बाजू घेतली; मात्र वैद्यकीय पुरावे आणि डॉक्टरांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
सोमनाथ सपकाळ हा पुण्यातील उत्तमनगर परिसरातील शिवणे येथे राहतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित महिलेच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. महिलेचा त्रास वाढल्यानंतर तिला ११ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफीसह अन्य वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर तिच्या पोटात ब्लेडचा तुकडा अडकल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा तुकडा बाहेर काढला. या घटनेनंतर उत्तमनगर पोलिसांनी सोमनाथ सपकाळ याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडित पत्नी आणि त्यांच्या मुलाने आरोपीविरोधातील साक्ष बदलली. कौटुंबिक वाद मिटल्याचे सांगत त्यांनी पतीविरुद्धचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आरोपीला दिलासा मिळण्याची शक्यता असतानाच सरकारी पक्षाने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आपली बाजू मांडली.
सरकारी वकील ॲड. पाठक यांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले. ब्लेडचा तुकडा अन्ननलिका किंवा आतड्याला छेद देऊ शकला असता आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन महिलेचा मृत्यूही होऊ शकला असता, अशी महत्त्वपूर्ण साक्ष डॉक्टरांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांना महत्त्व देत पत्नीची बदललेली साक्ष ग्राह्य धरली नाही.
दुसरीकडे, आरोपीच्या कुटुंबाची परिस्थिती मांडताना बचाव पक्षाने सोमनाथ हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून पत्नी आणि मुलगा त्याच्यावर अवलंबून असल्याचा युक्तिवाद केला. वैद्यकीय पुरावे, साक्षी आणि बचाव पक्षाची बाजू विचारात घेत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेऐवजी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.


