(संगमेश्वर/ रत्नागिरी)
वडिलांना विजेचा जोरदार धक्का बसून ते बेशुद्ध पडल्याचे पाहताच त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली. मात्र, वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच लोखंडी सळीतील वीजप्रवाहाचा धक्का बसून मुलालाच आपला जीव गमवावा लागला. काळजाचा ठाव घेणारी ही दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील पुर झेपलेवाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली. धिरज रामचंद्र झेपले (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने झेपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुर झेपलेवाडी येथील रामचंद्र बुधाजी झेपले यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये दिव्यासाठी विद्युत वाहिनी नेण्यात आली होती. ही वायर घराच्या मागील छपरावरील लोखंडी अँगलवरून गेली होती. दरम्यान, विद्युत वाहिनी कुठेतरी कापली गेल्याने तिचा संपर्क लोखंडी अँगलशी आला आणि छपराच्या लोखंडी सांगाड्यात विद्युत प्रवाह उतरल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी रामचंद्र झेपले आंघोळीसाठी पाणी घेण्याकरिता घराच्या मागील छपरातून जात असताना त्यांचा हात विद्युत प्रवाह उतरलेल्या लोखंडी सळीला लागला. क्षणात विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळले. वडील अचानक कोसळल्याचे पाहून घरात असलेला धिरज घाबरून त्यांच्या मदतीसाठी धावला. मात्र, छपराच्या लोखंडी भागात वीजप्रवाह उतरल्याची कल्पना नसल्याने मदतीसाठी पुढे सरसावलेल्या धिरजचाही हात त्याच लोखंडी सळीला लागला. विजेच्या तीव्र धक्क्याने तोही जागीच बेशुद्ध पडला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेने घरातील सदस्यांची धावपळ उडाली. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही विद्युत संपर्कातून बाजूला करून तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर धिरजला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वडिलांच्या मदतीला धावलेल्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची देवरूख पोलिसांनी नोंद घेतली असून, आकस्मिक मृत्यू क्रमांक ४६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेले पाऊल अखेरचे ठरले. संकटात सापडलेल्या वडिलांच्या मदतीला धावणाऱ्या धिरजचा काळाने असा घात केल्याने पुर झेपलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने झेपले कुटुंबाचा आधार हिरावला असून, गावावर शोककळा पसरली आहे.


