(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात एका मनोरुग्ण व्यक्तीने हातात काठी घेऊन प्रवाशांच्या अंगावर धाव घेण्याचे प्रकार घडत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अचानक घडत असलेल्या या प्रकारामुळे स्थानकावर उपस्थित प्रवासी आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रौढ व्यक्ती हातात काठी घेऊन स्थानक परिसरात फिरत असून अचानक प्रवाशांच्या अंगावर धाव घेत काठीने मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या प्रकारामुळे स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या मनोरुग्ण व्यक्तीने पोलिसांच्या अंगावरही धाव घेण्याचा प्रकार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संबंधित मनोरुग्ण व्यक्तीला तातडीने ताब्यात घेऊन प्रशासनाने त्याला रत्नागिरीतील मनोरुग्णालयात दाखल करून आवश्यक वैद्यकीय उपचार करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात असतात. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र देखील दिसून येत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने अशा प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

