( रत्नागिरी /प्रतिनिधी )
कोकणातील शिमगा उत्सवाला सुरुवात होताच गावागावांत एक वेगळेच दृश्य पाहायला मिळते. अंगात पोलिसांची वर्दी, हातात खेळण्यातील बंदूक, डोक्यावर टोपी, कमरेला पट्टा, तोंडात शिट्टी आणि खांद्यावर प्रमाणपत्रांनी भरलेली फाटकी पिशवी… असा वेश परिधान केलेला बहुरूपी कलाकार अचानक समोर उभा राहतो आणि क्षणात वातावरणात हशा आणि कुतूहल निर्माण होते.
महाराष्ट्रातील समृद्ध लोकपरंपरेत बहुरूपी हा एक महत्त्वाचा लोककलावंतांचा प्रकार मानला जातो. कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब नक्कल करणे, वेगवेगळे वेष परिधान करून संवाद आणि विनोदातून लोकांचे मनोरंजन करणे, ही या कलाकारांची खासियत. फौजदार, भगवान शंकर, हनुमान अशा विविध सोंगांतून ते गावोगावी फिरत लोकांचे मनोरंजन करीत आपल्या संसाराचा गाडा हाकतात. मात्र बदलत्या काळात या लोककलेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांमुळे करमणुकीची साधने थेट लोकांच्या हातात आली आहेत. त्यामुळे पूर्वी गावात उत्साहाने स्वागत होणाऱ्या बहुरूपी कलाकारांकडे आता फारसे लक्ष दिले जात नाही. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या वेशात दिसणाऱ्या या कलाकारांना कधी कधी भामटे किंवा फसवेगिरी करणारे समजून काहीजण संशयाने पाहतात. त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागते.
कोकणातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी Ratnagiri 24 News चॅनेल Subscribe करून बेल आयकॉन प्रेस करा.
काळाच्या ओघात निरनिराळी सोंगं धारण करून लोकांचे मनोरंजन करणारी ही बहुरूपी परंपरा हळूहळू लुप्त होत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. वाढती महागाई, हाताला कामाचा अभाव आणि बेकारी यामुळे ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना आपली कला जपताना संघर्ष करावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणात आलेले बहुरूपी कलाकार एस. एल. शिंदे सध्या रत्नागिरी शहरात गल्लोगल्ली फिरत आपली कला सादर करीत आहेत. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे विनोदी संवाद आणि धमाल शैली लोकांना क्षणभर का होईना, हसवून टाकते.
नक्की वाचा: संगमेश्वर बाजारपेठेत कसबा देवपाटच्या नमन मंडळाचा जल्लोष; तरुणांकडून पारंपरिक वारशाचे जतन
“शिमगा, गणपती अशा दोन उत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणात येत असतो. लोकांना आमची कला आवडली की ते स्वतःहून खिशात हात घालून पैसे हातावर ठेवतात. त्यातच समाधान मानावे लागते, असे बहुरूपी कलाकार शिंदे सांगतात. शिमग्याच्या सणासोबत कोकणात पोहोचणारे हे बहुरूपी कलाकार केवळ करमणूकच करत नाहीत, तर महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीची आठवणही जपून ठेवतात. मात्र बदलत्या काळात या कलेचे अस्तित्व टिकवण्यासाठी समाज आणि शासनाकडूनही ठोस पाठबळ मिळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

