(संगमेश्वर / एजाज पटेल)
सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ सध्या स्वतःच गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. एकेकाळी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी बसेस आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत रस्त्यावर धावताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आरामदायी आणि आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवशाही बसेसचीही अवस्था आता दयनीय झाली असून, तुटलेल्या भागांवर प्लास्टिकच्या पट्ट्यांचे ठिगळ लावून गाड्या प्रवाशांच्या सेवेत ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक गाड्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अनेक बसांच्या खिडक्यांच्या काचा निखळलेल्या आहेत, तर काही गाड्यांचे दरवाजे व्यवस्थित बंदही होत नाहीत. पावसाळ्यात आणि रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना थेट वारा आणि पावसाचा सामना करावा लागत आहे. काही आगारांमध्ये तुटलेल्या भागांची योग्य दुरुस्ती करण्याऐवजी प्लास्टिकच्या पट्ट्या, पिशव्या किंवा तात्पुरत्या साहित्याचा वापर करून मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महामंडळाची ‘हायटेक’ सेवा म्हणून ओळखली जाणारी शिवशाही बसही या दुरवस्थेतून सुटलेली नाही. अधिक पैसे मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता असुविधा आणि त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शिवशाही बसमधील सीट्स फाटलेल्या आणि मोडक्या अवस्थेत आहेत. खिडक्यांचे चॅनेल निकामी झाल्याने संपूर्ण प्रवासात काचा खडखडत राहतात. बाहेरील फायबरचे भाग तुटल्याने बस धावताना विचित्र आवाज येत राहतात. एकेकाळी दिमाखात धावणारी शिवशाही आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘दैनशाही’ बनल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
नियमांनुसार उत्तम स्थितीतील बसेसच लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मोडकळीस आलेल्या आणि खिळखिळ्या गाड्या थेट लांब पल्ल्याच्या सेवेत धावत आहेत. तीनशे ते पाचशे किलोमीटरच्या प्रवासासाठी अशा बस दिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यरात्री किंवा निर्जन भागात बस बंद पडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून नियमितपणे भाडेवाढ केली जाते; मात्र सुविधांच्या नावाखाली प्रवाशांना मोडक्या गाड्या आणि असुरक्षित प्रवासच मिळत असल्याची भावना जनतेत आहे. “शिवशाहीचे तिकीट महाग, पण बसमध्ये साधी खिडकीही व्यवस्थित नसते. प्रवासादरम्यान गाडी कधी बंद पडेल याचा नेम नसतो,” अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहेत.
महामंडळ नवीन बसेस कधी आणणार आणि विद्यमान गाड्यांची योग्य दुरुस्ती कधी करणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन एसटी महामंडळ आपल्या या ‘जीवनवाहिनी’ला नवसंजीवनी देणार का, की प्रवाशांना अशाच खुळखुळ्या गाड्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

