(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना रत्नागिरी विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तपासासाठी कोठडीची मागणी करण्यात आली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप डॉ. मदार यांच्यावर आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासण्यासाठी तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेकडून न्यायालयात नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयाने तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरत लाचखोर डॉ. मदार यांनाही दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसीबीकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार असून, लाचेच्या व्यवहाराशी संबंधित अन्य बाबींचा तपास वेगाने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसीबीच्या धडक कारवाईनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सुट्टीवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले डॉक्टर कुंबरे यांनी या प्रकरणी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत “घटनेची गंभीर दखल घेतली असून, शंभर टक्के पारदर्शक चौकशी केली जाईल,” असे ठामपणे सांगितले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) यासंदर्भातील पत्र आज प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासला जाणार आहे डॉ. मदार यांनी रुग्णांना देण्यात आलेल्या गोळ्या रुग्णालयातील अधिकृत औषधसाठ्यातून दिल्या गेल्या होत्या का, अथवा त्यासंबंधी इतरही बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी उद्या (६ जून) रोजी कामथे उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली जाणार असल्याचे डॉ. कुंबरे यांनी स्पष्ट केले आहे.

