(पुणे)
केंद्र सरकारने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सध्या सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाकिस्तानी नागरिकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले असून, तातडीने कारवाईचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी बहुतांशजण लाँग टर्म व्हिसावर आलेले असून, काही जण व्हिजिटर व्हिसावरही आहेत. बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या भागांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. गुरुवारी त्यापैकी तीन नागरिकांनी पुणे पोलिसांकडून एक्झिट लेटर घेऊन शहर सोडल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार, सीमेवरून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मेपूर्वी मायदेशी परतावे लागेल.
पोलिसांची सतत देखरेख
परदेशातून आलेल्या नागरिकांची स्थानिक पोलिसांकडे नोंदणी अनिवार्य असते. त्या अनुषंगाने, नागरिकांनी दिलेल्या पत्त्यावर ते वास्तव्य करत आहेत की नाही, तसेच त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन होते आहे की नाही, याची तपासणी वेळोवेळी पोलिसांकडून केली जाते.
पुण्यातील १११ पाकिस्तानी नागरिकांपैकी ३५ पुरुष आणि ५६ महिला लाँग टर्म व्हिसावर आले असून, उर्वरित २० नागरिक व्हिजिटर व्हिसावर आहेत. लाँग टर्म व्हिसा पाच वर्षांसाठी दिला जातो आणि त्यानंतर दोन वर्षांसाठी नूतनीकरण केला जातो. व्हिजिटर व्हिसा साधारणतः ४५ ते ९० दिवसांच्या कालावधीसाठी दिला जातो.
केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची याबाबत अद्याप परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व (एसओपी) आलेले नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.