(रत्नागिरी)
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) रत्नागिरी कार्यालयातर्फे नुकतीच विशेष व्यावसायिक विकास बैठक (Business Development Meeting) उत्साहात पार पडली. बीएसएनएलच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’चा (TIP) यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात हाय-स्पीड इंटरनेट सेवा ‘फायबर टू द होम’ (FTTH) क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र परिमंडळात उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच बीएसएनएलच्या दीप्ती पंडित यांनी ‘एफएम नोडल’ (FM Nodal) म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशामध्ये बीएसएनएलच्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत बीएसएनएल रत्नागिरीच्या उपमहाप्रबंधक (प्रचालन) अमृता लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भागीदारांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त भागीदार पुढीलप्रमाणे:
• प्रथम क्रमांक – श्रीशा एंटरप्रायझेस (विकास संगरे, रत्नागिरी)
• द्वितीय क्रमांक – महापुरुष एंटरप्रायझेस (नीलेश ऊर्फ राजू पेडणेकर, संगमेश्वर)
या दोन्ही भागीदारांनी वर्ष २०२५-२६ मध्ये रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरात मिळून ४०० हून अधिक नवीन FTTH कनेक्शन्स उपलब्ध करून देत बीएसएनएलची सेवा घराघरांत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर येथील महाप्रबंधक अरविंद पाटील आणि मुंबई येथील मुख्य महाप्रबंधक कार्यालयाच्या उपमहाप्रबंधक (FTTH) कल्पना पटेल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त भागीदार आणि रत्नागिरी टीमचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बीएसएनएलची ५६०० हून अधिक FTTH कनेक्शन्स कार्यरत आहेत. या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर’ (TIP) म्हणून बीएसएनएलसोबत जोडले जावे आणि नव्या व्यवसाय संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीएसएनएल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी बीएसएनएलच्या हाय-स्पीड आणि विश्वासार्ह ‘फायबर टू द होम’ (FTTH) इंटरनेट सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क:
FTTH सेवा किंवा भागीदारी योजनेबाबत अधिक माहितीसाठी दीप्ती पंडित यांच्याशी ९४२२७८९२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

