(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांनी सादर केलेल्या प्र. ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ या नाटकातील भूमिकेसाठी रत्नागिरीचा सुपुत्र आणि नवोदित अभिनेता मिनार गजानन पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक (रौप्यपदक) मिळाले आहे.
राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित नाट्य स्पर्धेतही समर्थ रंगभूमी रत्नागिरीच्या अग्निपंख या नाटकाने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पुरस्कार मिळवले होते. त्या स्पर्धेत या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर दिग्दर्शक ओंकार पाटील आणि संपूर्ण टीमचे नाट्यप्रेमींनी कौतुक केले होते. जिल्हास्तरीय यशानंतर या नाटकाची राज्य नाट्य स्पर्धेसाठी निवड झाली होती.
राज्यस्तरीय स्पर्धेत अग्निपंख नाटकातील महत्त्वपूर्ण भूमिकेत मिनार पाटील यांनी साकारलेला दमदार अभिनय परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्याच्या प्रभावी सादरीकरणामुळे त्यांना अभिनयाचा प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.
मिनार पाटील हे मागील अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध नाटके तसेच मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांना मिळालेले हे राज्यस्तरीय यश उल्लेखनीय मानले जात आहे. नाट्यरसिकांकडून तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
दरम्यान, या राज्य नाट्य स्पर्धेत राज्यभरातील तब्बल ४७ नाट्यसंघांनी सहभाग नोंदवला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेत अग्निपंख नाटकाने सर्वच विभागांत उत्कृष्ट कामगिरी केल्याने राज्यस्तरावरही या नाटकाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. त्यानुसार हे नाटक राज्य स्पर्धेतही अत्यंत दर्जेदार पद्धतीने सादर करण्यात आले होते. रत्नागिरीतील प्रयोगालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाटकाचे भरभरून कौतुक केले होते.
मात्र जाहीर झालेल्या अंतिम निकालात उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला असला तरी इतर विभागांतील निकाल पाहून काही नाट्यप्रेमींमध्ये भ्रमनिरास झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. तरीही मिनार पाटील यांच्या यशामुळे रत्नागिरीच्या नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.

