(खेड /रत्नागिरी)
भावकीतील लोकांना शिवीगाळ का करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ५३ वर्षीय व्यक्तीला बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील चाकाळे खरोशीवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर देवजी शिंदे (वय ५३, रा. चाकाळे खरोशीवाडी, ता. खेड) हे २ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता आपल्या घरी जेवण करत असताना शेजारील वैभव वामन कडू हा भावकीतील लोकांना शिवीगाळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारावर आक्षेप घेत शिंदे यांनी त्याला जाब विचारला. याच कारणावरून वाद चिघळत गेला आणि वैभव कडू याने हातातील बांबूच्या काठीने शिंदे यांच्या दोन्ही पायांवर हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले वामन बाळू कडू (वय ६०) आणि विनायक वामन कडू (वय ३५) यांनीही शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तिघांनी मिळून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जखमी सुधीर शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार ३ जून २०२६ रोजी रात्री १.३४ वाजता तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १६०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

