(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वासाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील वाढत्या सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन तसेच स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत सुसज्ज ‘मिनी थिएटर’ उभारण्यात आले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन आज ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळणार असून स्थानिक कलाकारांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघुनाट्य, नाट्यछटा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने आणि विविध कलाविष्कारांसाठी हे थिएटर उपयुक्त ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.
या मिनी थिएटरच्या उद्घाटन सोहळ्यास रत्नागिरीतील कलाकार, रंगकर्मी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

