(संगमेश्वर / वार्ताहर)
कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाचा उत्साह सध्या सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधत संगमेश्वर येथील बाजारपेठेत कसबा देवपाट येथील नमन मंडळाने आपल्या लोककलेचे प्रभावी सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. विशेष म्हणजे, पूर्वजांनी सुरू केलेली ही नमन परंपरा आजच्या तरुण पिढीतील कलाकारांनी तेवढ्याच निष्ठेने आणि पारंपरिक पद्धतीने जपल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
शिमगोत्सवानिमित्त नमन मंडळातील कलाकारांनी संगमेश्वर बाजारपेठेतील प्रत्येक दुकानाला भेट देत आपली कला सादर केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनीही या मंडळाचे आनंदाने स्वागत करत त्यांच्या कलेला दाद दिली.
तरुण कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग
बदलत्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना कसबा देवपाट येथील तरुणांनी मात्र आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा ध्यास घेतला आहे. पूर्वजांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसारच नमन सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी जुन्या पिढीतील जाणकारांनीही या तरुणांच्या कौशल्याचे आणि परंपरेप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले.
कोकणातील नमन ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती स्थानिक संस्कृतीची ओळख आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी तरुण पिढीचा असाच सहभाग आणि पुढाकार आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

