(पुणे)
राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शालेय शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व पालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात केली.
बालेवाडी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी भुसे बोलत होते. या वेळी शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालनालय (योजना) पुणेचे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक अनुराधा ओक आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, “शिक्षण हे आनंददायी, गुणवत्तापूर्ण, उपयुक्त आणि राष्ट्रभावनेला बळ देणारे असले पाहिजे. महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे आहे.” त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा सुधारणा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, शिष्यवृत्ती परीक्षा आणि निपुण भारत अभियान यावर भर दिला.
शालेय स्तरावरील १५ समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचे सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा केली. भुसे म्हणाले, “विद्यार्थी हेच आपले दैवत असून शिक्षक हे शाळारूपी मंदिराचे पुजारी आहेत,” आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या चौकसपणासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व अधोरेखित केले. ऐतिहासिक स्थळांना भेटी, शेतीतील कामांचे निरीक्षण, बँकेचे व्यवहार समजण्यासाठी सहली काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा आयोजित करण्याचे निर्देश दिले.

