(पुणे)
पिंपरी-चिंचवड शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी 50 अवैध पिस्तुलं, 79 जिवंत काडतुसे आणि 116 धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याशिवाय, विविध पोलीस ठाण्यांमध्ये 40 गुन्हे नोंदवून 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांनी आणि गुन्हे शाखांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली. शहरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचा आणि शस्त्रधारी गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्याचा यामागचा उद्देश होता.
जप्त केलेल्या अवैध शस्त्रांमध्ये 50 पिस्तुलं आणि 79 जिवंत काडतुसे आहेत. तर, धारदार शस्त्रांमध्ये 91 कोयते, 12 तलवारी, 4 पालघन आणि 6 चाकू/गुप्ती/सुरा यांचा समावेश आहे. ही शस्त्रे गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरण्यात येत होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर पिस्तुलं किंवा कोयत्यांसह फोटो, व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करून स्वतःचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा प्रकारे समाजात भीती निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त चौबे यांनी स्पष्ट केले की, शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही ही शोधमोहीम केवळ एकदाच नव्हे, तर सातत्याने राबवली जाणार आहे. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे ही पोलिसांची प्राथमिकता आहे.

