(नालासोपारा )
नालासोपारा परिसरात एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाहतूक जाममुळे रुग्णवाहिका पाच तास अडकली आणि यामुळे दीड वर्षाच्या रियान शेख या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना प्रशासनाच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी आणि आपत्कालीन व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे धक्कादायक उदाहरण ठरली आहे.
कुर्ला येथील रियान शेख आपल्या आईवडिलांसह वसईतील पेल्हार परिसरात गुरुवारी आला होता. दरम्यान, त्या इमारतीमध्ये तो खेळत असताना चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पोटाला मोठी ईजा झाली होती. रियानच्या वडिलांनी तातडीने त्याला जवळच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु गंभीर दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
दुपारी सुमारे २.३० वाजता रियानला मुंबईकडे नेण्यासाठी रुग्णवाहिका रवाना करण्यात आली, पण मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ती पाच तास वाहतूककोंडीत अडकली. दुरुस्तीचे काम आणि वाहतूक नियोजनातील कमतरता यामुळे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या भीषण कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकली. सायरन वाजत होता पण सगळे व्यर्थ होते. रियानची प्रकृती ढासळल्याने रुग्णवाहिकेला ससूनवघर गावातील लहान रुग्णालयात थांबावे लागले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांनी प्राण गमावलेल्या मुलाकडे पाहून हंबरडा फोडला.
या घटनेनंतर वसई परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी महामार्गावरील वाहतूक नियोजनातील त्रुटी, देखभालातील अक्षम्य हलगर्जीपणा आणि आपत्कालीन सेवांमध्ये रुग्णवाहिकांना दिले जाणारे कमी प्राधान्य यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही नागरिकांनी म्हटले की, २०-२५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही.

