टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. मे महिन्यात स्टेज-2 लिव्हर कॅन्सर निदान झाल्यापासून चाहत्यांची चिंताही वाढली आहे. आपल्या नवीन व्लॉगमध्ये दीपिकाने उपचारांच्या साइड इफेक्ट्समुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा उलगडा केला आहे.
दीपिकाने सांगितले की, लिव्हरमध्ये टेनिसबॉलइतका ट्यूमर आढळल्याने उपचार सुरू आहेत, मात्र हा कॅन्सर अजून तिच्या शरीराच्या इतर भागात पसरलेला नाही. तरीही, औषधे आणि उपचारांमुळे केस गळणे, मूड स्विंग, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. दीपिकाने सांगितले, “जेव्हा मी आंघोळ करून बाहेर येते, तेव्हा केस गळण्याची भीती वाटते. मी १०–१५ मिनिटे शांत बसते आणि कोणाशीही बोलत नाही.”
तिच्या व्लॉगमध्ये दीपिकाने थकवा, मूड स्विंग आणि मानसिक त्रास याबाबत उघडपणे सांगितले. जरी या दुष्परिणामांची सवय झाली असली तरी हा प्रवास खूप कठीण आहे. तरीही, तिने आपले वैद्यकीय अहवाल चाहत्यांसोबत शेअर केले, ज्यात तिच्या टेस्ट्स नॉर्मल आल्या आहेत, आणि हे तिच्यासाठी आशेचा किरण ठरले आहे.
दीपिका आणि पती शोएब यांनी चाहत्यांना सल्ला दिला की, साध्या पोटदुखी किंवा हलक्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. दीपिकाच्या अनुभवावरून दिसते की, काही वेळा सामान्य समस्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.
लिव्हर कॅन्सरची प्रमुख लक्षणे
- सतत पोटदुखी, विशेषतः उजव्या वरच्या भागात दुखी
- पोटात सूज वाटणे, भूक न लागणे, थोड्या प्रमाणात खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटणे
- वजन कमी होणे, सतत थकवा आणि अशक्तपणा
- मळमळ, उलट्या आणि पिवळसर डोळे किंवा त्वचेचा रंग
दीपिकाचा अनुभव आपल्याला वेळेवर तपासणी करणे , लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण लवकर निदान केल्यास उपचार प्रभावी होऊ शकतात.

