(नवी मुंबई)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला सोनम डोंगरे यांचा 1 जुलै रोजी मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली होती. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
30 जून रोजी ऐरोली रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा या दोन आठ महिन्यांच्या गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर दोघींची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले. दोन्ही महिलांना तातडीने नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला, तर रिचा मिश्रा यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मनसे, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, चौकशी समितीत ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, प्रसूतीतज्ज्ञ संघटनेचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. संबंधित इंजेक्शनचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

