(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील कामथे घाटासह विविध अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणी तातडीने आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित संसदीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार भास्कर जाधव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
कामथे घाटातील अपघातांबाबत गंभीर चिंता
कामथे घाटात सातत्याने होत असलेल्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत खासदार तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीने सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावर प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी घाटात दिशादर्शक फलक आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक बसविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. घाट परिसरात वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश खासदार तटकरे यांनी दिले.
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्याचे आवाहन
रस्त्यांवर मोकाट जनावरे सोडण्याच्या वाढत्या प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले.
‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यासाठी कॅशलेस योजनेची प्रभावी अंमलबजावणी
रस्ते अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी शासनाच्या कॅशलेस उपचार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
आमदार भास्कर जाधव यांनी मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा उपस्थित करत नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच अपघाताच्या वेळी महामार्ग पोलिसांशी समन्वय साधून त्वरित मदत पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. आमदार किरण सामंत यांनी निवळी, हातखंबा, कापडगाव आणि वेरळ घाट या संवेदनशील व अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
पोलिसांच्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटल्याचा दावा
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे रस्ते सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट्स) ओळख करून तेथे सुरक्षा ड्रम बसविणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम राबविणे आणि मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळातही विविध सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून रस्ते अपघातांमध्ये आणखी घट करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

