(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्य शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे येथील विभागीय क्रीडा निपुणता केंद्र (निवासी केंद्र) यासाठी रोईंग (Rowing) आणि कुस्ती (Wrestling) या क्रीडा प्रकारांच्या फेर-निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. मार्च २०२६ मध्ये झालेल्या निवड चाचण्यांना या दोन खेळांसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने इच्छुक आणि पात्र खेळाडूंना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
राज्यातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, दर्जेदार क्रीडा सुविधा, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र तसेच देश-विदेशातील संस्थांचे तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना राबविण्यात येत आहे.
रोईंग निवड चाचणी
दिनांक: २२ जुलै २०२६
वेळ: सकाळी ९.०० वाजता
स्थळ: क्रीडा संकुल, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, पुणे
संपर्क: संदीप भापकर (रोईंग प्रशिक्षक) – ९८२२२३५५७७
कुस्ती निवड चाचणी
दिनांक: २४ जुलै २०२६
वेळ: सकाळी ९.०० वाजता
स्थळ: ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव, नीरा-बारामती रोड
संपर्क: श्री. शेलार – ९०७५१०७१२१ / श्री. रणवरे – ९४२३२४०२८०
पात्रता : या निवड चाचणीसाठी २५ वर्षांखालील असे खेळाडू पात्र असतील, ज्यांनी अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविले आहे.
आवश्यक कागदपत्रे : इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीसाठी उपस्थित राहताना खालील मूळ कागदपत्रे आणि आवश्यक क्रीडा साहित्य सोबत आणणे बंधनकारक आहे. त्यामध्ये जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला (एल.सी.), अधिवास प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र याचा समावेश आहे.
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावी, अशी सूचना क्रीडा विभागाने केली आहे. राज्यस्तरावर प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचा पात्र खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

