( दापोली )
दापोली तालुक्यात नोकरीच्या शोधात असलेल्या २२ वर्षीय तरुणीची तब्बल १० लाख ३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजगारविषयक एका प्लॅटफॉर्मवर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर अज्ञात सायबर भामट्यांनी करार (अॅग्रीमेंट) रद्द करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सायबर फसवणुकीचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील आसूद येथील २२ वर्षीय तरुणीने ४ जून २०२६ रोजी एका रोजगार संकेतस्थळावर अकाउंट्स विभागातील नोकरीसाठी अर्ज केला होता. अर्जानंतर एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधून व्हॉट्सॲपवर नोकरीसंदर्भातील करारपत्र पाठवले.
मात्र, संबंधित काम पसंत न पडल्याने तरुणीने तो करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली. याचाच गैरफायदा घेत आरोपीने करार रद्द करण्यासाठी विविध शुल्क भरावे लागेल, असे सांगून तिची दिशाभूल केली.
आरोपीच्या सांगण्यावरून संबंधित तरुणीने ६ जून ते १२ जुलै २०२६ या कालावधीत गुगल पे, फोनपे आणि ऑनलाईन बँकिंगद्वारे आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा केले. अशाप्रकारे तिच्याकडून एकूण १० लाख ३०० रुपये उकळण्यात आले.
नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने तातडीने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. आर्थिक व्यवहारासाठी वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांची माहिती तपासली जात असून सायबर गुन्हेगारांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ऑनलाइन नोकरी शोधणाऱ्यांसाठी पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली नोंदणी शुल्क, करार रद्द शुल्क, प्रोसेसिंग फी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पैसे मागितल्यास त्याची खातरजमा करावी. अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंक, करारपत्रे किंवा बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत माहिती पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगार रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींना लक्ष्य करत असल्याने ऑनलाइन नोकरीसाठी अर्ज करताना अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

