(मुंबई)
बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ३ ते ८ जून या कालावधीत राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे मुस्लिम समाजासह शेतकरी, हमाल, दलाल, विक्रेते आणि कुरेशी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बंदीमागील कारणे आणि कायद्याचा आधार
गोसेवा आयोगाच्या परिपत्रकानुसार, बकरी ईदच्या काळात जनावरांची विशेषतः गायी आणि बैलांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी लागू करण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की ‘महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायद्या’नुसार गाय, बैलांची कत्तल आणि गोमांस बाळगणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन रोखण्यासाठी बाजार बंद ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
इतर जनावरांच्या विक्रीवरही परिणाम
मात्र, या निर्णयाचा फटका केवळ गोवंशापर्यंत मर्यादित न राहता, शेळी, मेंढी आणि म्हशींच्या विक्रीवरही पडणार आहे, ज्यामुळे बकरी ईदसाठी जनावरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसह लाखो विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या काळात शेळी-मेंढ्यांच्या विक्रीस सर्वाधिक मागणी असते.
“गोसेवा आयोगाला बाजार बंद करण्याचा अधिकार नाही” – फारूख अहमद
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूख अहमद यांनी या बंदीवर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले, “गोसेवा आयोग हे सल्लागार संस्था असून त्यांना बाजार बंद ठेवण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत.” त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, “शेळी-मेंढ्या ज्यांच्यावर गोवंश बंदी कायदा लागू होत नाही, त्यांच्या विक्रीवर बंदी कशी?”
गोसेवा आयोगाचा खुलासा : केवळ सूचना, बंधनकारक नाही
गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ही बंदी बंधनकारक नसून फक्त बाजार समित्यांना सूचना दिल्या आहेत.” त्यानुसार, महाराष्ट्रातील ३०५ मुख्य आणि ६०३ दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी २९२ ठिकाणी जनावरांचे बाजार भरतात, जे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाआधी अत्यंत महत्त्वाचे असतात.