( मुंबई )
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले आहे. किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत काही तासांतच आरोपी पतीला अटक केली.
पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर नियंत्रण कक्षाकडून जोगेश्वरी पश्चिमेतील आदर्श नगर येथील अॅस्टर बिल्डिंगसमोर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार
घटनास्थळी पोलिसांना महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळले. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. परिसरातील नागरिकांनी महिलेची ओळख 35 वर्षीय झुमरी धीरज पवार अशी पटवून दिली. स्थानिकांच्या माहितीनुसार, तिचा पती धीरज पवार यानेच तिच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला होता. गंभीर जखमी अवस्थेतील झुमरी पवार यांना पोलिसांनी निर्भया वाहनातून तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. रागाच्या भरात धीरज पवार याने घरात असलेल्या चाकूने पत्नीच्या मानेवर वार करून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धीरज पवार आणि त्यांची पत्नी झुमरी हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रोजगारानिमित्त ते दोघेही वारंवार मुंबईत ये-जा करत असत. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन मुले असून, तिघेही सध्या अमरावती येथे राहतात. कामानिमित्त पवार दांपत्य सोमवारी मुंबईत आले होते. त्यांच्या कुटुंबात यापूर्वीपासूनच वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील आदर्श नगर परिसरात दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला, त्यानंतर या घटनेला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली. तांत्रिक माहिती आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बेहरामबाग परिसरातून धीरज पवार याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ओशिवरा पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

